सांगलीच्या साहित्य चळवळीचा होतोय गौरव

0

जत तालुक्यातील निगडी बुद्रुक गावचे सुपुत्र असलेले आणि युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेले ‘फेसाटी’ आत्मकथनाचे लेखक नवनाथ गोरे यांची आत्मकथा आता मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात असणारे विद्यार्थी अभ्यासणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांची आत्मकथा बी. ए. च्या अभ्यासक्रमासाठी निवडली आहे. अत्यंत उपेक्षित असे जीवन वाट्याला आलेल्या नवनाथ यांनी महाविद्यालयीनपूर्व जीवन आपल्या आत्मकथेत रेखाटले आहे. मात्र दुर्दैव असे की, आजही त्यांचा जगण्याचा संघर्ष संपलेला नाही. वयाच्या तिसाव्या वर्षीदेखील त्यांना पोटासाठी झगडावे लागत आहे. दुसरीकडे त्यांच्या आयुष्याचा अभ्यास कॉलेजचे युवक करणारा आहेत. शेवटी संघर्ष हा कुणालाच चुकला नाही. असे असले तरी त्यांची साहित्य विश्वात मात्र आवर्जून दखल घेतली जात आहे.

बिळूरमधील आणखीन तिघे कोरोना पॉझिटिव्ह | बाधित संख्या 69

त्यांनी एवढ्यावरच न थांबता चांगले सकस, दर्जेदार साहित्य वाचकांना द्यावे, हीच अपेक्षा आहे. ‘गबाळ’ या गाजलेल्या आत्मकथा साहित्य प्रकाराचे लेखक दादासाहेब मोरे हेसुद्धा जत तालुक्यातीलच! गोंधळेवाडी या छोट्याशा गावातून त्यांची भटकंती सुरू झाली.  आज दादासाहेब मोरे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात उच्च पदावर असले तरी त्यानंतर त्यांचे मराठी साहित्यात योगदान दिसत नाही,परंतु त्यांनी हिंदी साहित्य क्षेत्रात मात्र चांगली भरारी घेतली आहे, याचा उल्लेख करणं इथे महत्त्वाचं वाटतं.

आपल्या जत तालुक्याला खेटून असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग गावचे सुपुत्र असलेल्या आणि सांगलीच्या साहित्य चळवळीत एक दबदबा असलेल्या कवी दयासागर बन्ने यांच्या एका पुस्तकाचाही समावेश मराठवाडा विद्यापीठाने अभ्यासक्रमात केला आहे. ‘तिफण’ या  हायकू काव्यसंग्रहाचा येथील कॉलेजची मुले अभ्यास करणार आहेत. ‘हायकू’ हा जपानी साहित्य प्रकार मराठीत अजून नवखा आहे. ‘हायकू’ म्हणजे उत्कट भावनेचा सौंदर्यउद्गार असल्याचं बन्ने सांगतात. रवींद्रनाथ टागोरांनी जपानमधून भारतात पहिल्यांदा हा प्रकार आणला, मराठीत तो ज्येष्ठ कवी शिरीष पै यांनी आणला. अत्यंत कमी आणि मोजक्या शब्दात लिहिण्याचे कसब ‘हायकू’तून दिसते. 

कुपवाड खून प्रकरणाचा छडा | जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले 5 संशयित आरोपींना ताब्यात

” विद्यापीठांच्या पातळीवर ‘हायकू’च्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पारंपरिक साहित्य प्रकारांबरोबरच ‘हायकू’लाही अभ्यासात योग्य दर्जा दिला पाहिजे. संशोधनातही ‘हायकू’ला स्थान मिळाले पाहिजे. हा प्रकार मराठीत रुढ व्हायला हवा,” असं म्हणणाऱ्या बन्ने यांची इच्छा आता दृष्टिक्षेपात आहे.  मिरज परिसरात  शाळेतील मुलांकडून त्यांनी कविता लिहून घेतल्या. त्यातील मोजक्या कविता निवडून चांगली चित्रे काढणाऱ्या मुलांना वाचायला देऊन चित्रे काढायला लावली. या कविता आणि चित्रांचे पुस्तक दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. मुलांसाठीच्या या उपक्रमातून चांगले साहित्यिक अथवा कवी निर्माण होतील, आणि त्यांच्या साहित्यविषयक जाणिवा समृद्ध होतील, अशी आशा त्यांना आहे. गेली सहा वर्षे जिल्ह्यात विद्यार्थी साहित्य संमेलन भरविण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. शिवाय देशिंगला दरवर्षी अग्रणी साहित्य संमेलन भरवले जाते. ग्रामीण साहित्यिकांना ही एक पर्वणीच आहे.

Rate Card

याच विद्यापीठाने तासगाव तालुक्यातील येळावी येथील लेखक रवी राजमाने यांच्या ‘वाळवण’ या कादंबरीचा समावेश एम.ए. साठी केला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय  सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील जेष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांच्या ‘भली माणसं’ या व्यक्तीचित्रण संग्रहातील ‘बाबा मास्तर’ हे एका ग्रथपालावर लिहिलेलं व्यक्तीचित्राचा  शिवाजी विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे. नवोदित लेखकांचे दिलखुलासपणे कौतुक करणारे दि. बा. लेखकासाठी एक ऊर्जेचा स्त्रोत आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक साहित्यिकाला हवाहवासा वाटणाऱ्या  रांगड्या मातीतल्या या ग्रामीण साहित्यिकाची दखल शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने घेऊन दि.बां चा ‘बाबा मास्तर’पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाविद्यालयात पोहचवून ‘दि. बां.’ चा सन्मान केला आहे. आटपाडी  तालुक्यातील शेटफळेचे  ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सयाजीराव मोकाशी यांच्या ‘पंधरा ऑगस्ट’ या कथासंग्रहातील ‘बाबासाहेब वस्ताद’  या सामाजिक काम करणारा पैलवानाचे व्यक्तीचित्रणाचाही कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बी ए भाग तीनच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे. मायणी येथील कॉलेजचे प्राचार्य असलेल्या मोकाशी यांचे कथासंग्रह, कादंबरी आणि समीक्षापर पुस्तके प्रकाशित आहेत.  ते माणदेश साहित्याचे अभ्यासक असून ‘इर्जीक’ सह अनेक साहित्य चळवळीशी निगडित आहेत. अलीकडेच त्यांनी ‘माणमुद्रा’ पुस्तकाचे संपादन केले आहे.  

सांगली येथील उपशिक्षणाधिकारी आणि प्रसिध्द लेखक नामदेव माळी यांची ‘खरडछाटणी’ ही कादंबरी गेल्यावर्षी नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागली होती. श्री.माळी यांनी जिल्ह्यात विद्यार्थी साहित्य संमेलनाचा पाया घातला. नवोदित लेखकांचे आणि चिमुकल्या साहित्यिकांचे मार्गदर्शक असा त्यांचा नावलौकिक आहे. शिक्षण क्षेत्रात वेगळी वाट चोखाळून विद्यार्थ्यांना सर्वांगीणदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम ते निरंतर करीत असतात. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. पलूस तालुक्यातील आमणापूरचे लेखक संदीप हरी नाझरे यांचा ‘पण थोडा उशीर झाला’ हा पाठ महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक महामंडळाच्या अर्थात बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे. ‘पण थोडा उशिर झाला’ हा पाठ त्यांच्या ‘सांगावा’ या कथेवर आधारित आहे. या पाठातून सैनिकांचा त्याग आणि राष्ट्रनिष्ठा

विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कथा म्हणजे लेखकाचे वडील हरी दत्तू नाझरे यांचा 1982 सालचा अनुभव आहे. कारगिलसारख्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरूण आपल्या आजारी आईला पहायला घरी येतो, पण त्याआधीच त्याची आई गेलेली असते. देशप्रेम आणि आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा प्रसंग लेखकाने या पाठात चित्रीत केला आहे.  त्याचबरोबर जतसारख्या दुष्काळी तालुक्यातील लेखक ,शिक्षक आणि पत्रकार असलेल्या मच्छिंद्र ऐनापुरे यांनी  लिहिलेल्या ‘धाडसी कॅप्टन राधिका मेनन’ यांच्या व्यक्तिचित्रणाचा समावेश पाठ्यपुस्तक मंडळाने आठवी इयत्तेच्या बालभारती पुस्तकात केला आहे. पाच पुस्तकांचे आणि अनेक ब्लॉगचे निर्माते असलेल्या ऐनापुरे यांची ही साहित्य क्षेत्रातील भरारी वाखाणण्याजोगी आहे. नेलकरंजीच्या ज्येष्ठ कवयित्री स्वाती शिंदे-पवार यांच्या काही कवितांची दखल पाठ्यपुस्तक मंडळाने घेतली आहे.पाठ्यपुस्तक महामंडळ आणि विद्यापीठ अशा विविध अभ्यासक्रमात समावेश   ही साहित्यिक सांगलीकरांची साहित्य सुगी सुरू झाली आहे असल्याचे आमचे मित्र शिक्षक आणि कवी गौतम कांबळे यांनी म्हटले आहे. यात अतिशयोक्ती अजिबात नाही.  सांगली जिल्ह्याला साहित्याची मोठी उज्ज्वल परंपरा आहे. अलीकडच्या साहित्यिकांनी त्यात मोलाची भर घालण्याचे काम केले आहे. ही उज्ज्वल परंपरा अशीच अखंड तेवत राहील यात शंकाच नाही.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.