उत्तम जानकर- गोपीचंद पडळकर दोघेही ‘महाठग’ | त्यांच्यावर सुपरहिट सिनेमा होईल!

0

विक्रम ढोणे यांची टिका



जत,प्रतिनिधी : ”उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी धनगर आरक्षण आंदोलनाची वाट लावली. हे दोघेही ‘महाठग’ असून त्यांनी धनगर चळवळीचे मोठे नुकसान केले आहे’, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

चार दिवसांपुर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली. त्यावरून राज्यभरात निषेध सुरू असताना 

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी पडळकरांचा निषेध केला, तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पडळकरांना धनगर आरक्षण लढ्यातून बेदखल करण्यात आले. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भाने विक्रम ढोणे यांनी आपली भुमिका मांडली आहे.

Rate Card

ढोणे यांनी म्हटले आहे की, धनगरांच्या एसटी आरक्षणाची मागणी फार जुनी आहे, मात्र गेल्या सात आठ वर्षांत भाजपने धनगर मतांवर डोळा ठेवून फक्त मतांचे राजकारण चालवले आहे. भाजपप्रणित धनगर नेते समाजात सोडून आपल्या सोयीचे घडवून आणायचे, हा डाव सातत्याने खेळला जात आहे. 2012 ला विकास महात्मे यांना याच पद्धतीने भाजपने सोडले होते. एसटी आरक्षणासाठी फार पुरावे असल्याचे ते सांगत होते, मात्र ते म्हणत होते त्याप्रमाणे काहीही घडलेले नाही. ते खासदार झाले, पण समाजाचा प्रश्न 1 टक्केही सुटला नाही. सर्वच प्रस्थापित पक्ष आरक्षणाच्या नावाखाली व्होटबँक पॉलिटिक्स करत आहेत. त्यामुळे समाजाच्या समोर सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे. 

ऑगस्ट 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत उत्तम जानकर- गोपीचंद पडळकरांनी चालवलेले ‘अखेरचा लढा’ हे आरक्षण आंदोलन बोगस असल्याचे आम्ही त्यावेळी सांगितले होते. समाजाला आरक्षणाचे सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी नव्हे तर त्या दोघांना आमदारकीचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ते आंदोलन असल्याची जाणीव आम्ही करून दिली होती. ते काही दिवसांत खरे ठरले. 80 दिवसांत सर्टिफिकेट मिळवून देतो म्हणणाऱ्या पडळकर आणि उत्तम जानकरांनी 80 दिवसाला पक्ष बदलले. एकाने आमदारकीचे सर्टिफिकेट मिळवले, दुसऱ्याचे थोडक्यात हुकले, पण ते नव्याने मिळतेय का यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत.

उत्तम जानकर आणि पडळकर यांनी सहा महिने आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली सभा घेतल्या. राज्यातील प्रमुख पक्षांना आम्ही धनगर नेते आहोत असे भासविले. त्यातून सर्व प्रमुख नेतेमंडळींकडे जावून खासदारकी, आमदारकीचे तिकीटे, विधान परिषद मिळवण्यासाठी तडजोडी केल्या. हे आता लपून राहिलेले नाही. ते आंदोलन उत्तम जानकर- पडळकर या दोघांचेच होते. त्यांच्या सभांच्या स्टेजवर या दोघांव्यतिरिक्त इतरांना बसायला बंदी होती. भांडवली गुंतवणुकीतून हेलिकॉप्टरने दौरे करून त्यांनी समाजाला भुलवले. स्वत:चा स्वार्थ साधला की तो विषय सोडून दिला. आता नवीन स्वार्थ साधायचा उद्योग उत्तम जानकर आणि पडळकर यांनी सुरू केला आहे. एकजन भाजप तर दुसरा राष्ट्रवादीकडून आरक्षणप्रश्न सोडविण्याच्या बाता मारत आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एफिडिव्हेटविषयी खोटी माहिती दोघांनी समाजाला दिली आहे. धनगर आणि धनगड हे एकच आहेत, असे एफिडिव्हेट दिल्याचे उत्तम जानकर- पडळकर यांनी सांगितले आहे. पण तशी वस्तुस्थिती नाही. धनगर समाजाला हेच लोक वेडे बनवत आहेत. मात्र त्यांच्या समाजसेवेचे ढोंग पार दिवस चालणार नाही, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

उत्तम जानकर- पडळकर हे हेलिकॉप्टरने दौरे करून आरक्षण मागत होते, जनतेला बिरोबाची शपथ घालून राजकीय नेत्यांसोबत तडजोडी करत होते. हे कथित आंदोलन सुरू असताना उत्तम जानकर- पडळकर यांच्या भुमिका असलेल्या धुमस चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. अगदी लोकसभेच्या तोंडावर त्यांनी हा चित्रपट रिलीज केला. धनगर तरूणांच्या भावनेला हात घालून त्यांनी हिरो बनण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्षात हे दोघेही खलनायक आहेत. हे दोघे समाजासाठी काम करत नाहीत, ते पक्षासाठी त्यांच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. ते कुठल्याही पक्षात असलेतरी ते स्वत:चा स्वार्थ साधतात. त्यांनी केलेल्या फसवणुकीवर सुपरहिट सिनेमा तयार होईल, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.