सातबारा संगणकीकरणासाठी | विशेष शिबीरांच्या माध्यमातून धडक मोहीम | जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
– पहिला टप्पा पूर्ण, दुसरा टप्पा ४ डिसेंबर पासून
सांगली : सन 2018-19 मधील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच जुलै ते ऑगस्ट या महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पाऊस यामुळे नियमित महसूल कामे प्रलंबित राहिली आहेत. यामध्ये सातबारा संगणकीकरणाची कामे देखील प्रलंबित राहिलेली आहेत. त्यामुळे क्षेत्रिय स्तरावरून फेरफार नोंदी, सातबारा संगणकीकरण याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. या सर्व तक्रारींचा झपाट्याने निपटारा करून कामे सुरळीत करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्कल, तलाठी अशा सर्वच महसूल यंत्रणा यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सदरची शिबीरे ही दोन टप्प्यात राबविण्यात येत असून टप्पा क्रमांक एक हा २८ ते ३० नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यात आला आहे. तर दुसरा टप्पा ४ ते ७ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. दिनांक ४, ५, ६, ७ डिसेंबर रोजीही तहसिल स्तरावर पूर्णवेळ शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरांमध्ये तहसिलदार, उपअधिक्षक भूमि अभिलेख, सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व परीरक्षक भूमापक उपस्थित रहात आहेत. शिबीराच्या कालावधीत पूर्ण दिवसभर कार्यालयीन वेळेत नियोजित हॉलच्या बाहेर न जाता फेरफार नोदींच्या निर्गती, १५५ आदेश निर्गती, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील कलम २५७ च्या आदेश निर्गती व अन्य महसूलशी संबंधित कामे जागेवरच करण्यात येत आहेत. पूर्ण जिल्ह्यातील सर्व तहसिलमध्ये शिबीर कालावधीत एकाच वेळी कामकाज होईल याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

ReplyForward |