दूध भेसळीवर ‘अन्न-औषध’ची ‘कृपा’| विनाभेसळ दुध शोधणे कठीण : कारवाया थांबल्या

0

जत : दुधातील भेसळ थांबविण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषधे सहाय्यक उपायुक्‍त (एफ.डी.ए.)सांगली कार्यालयाने वर्षभरात दूध भेसळीवर बोटावर मोजण्याएवढ्या कारवाई केली आहे. वेळेवर दुधाचे नमुनेही तपासले जात नसल्याने दुधात भेसळ करणारे मोकाट झाले आहेत. हेच भेसळीचे दूध आबाल-वृद्धांच्या पोटात जात आहे. कारवाई न होण्याचे कारण या कार्यालयात मनुष्बळाचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. उपायुक्‍तांसह निरीक्षकांवर जिल्ह्यातील अन्न पदार्थांची भेसळ रोखण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील अनेक सहकारी दूध संघ गैरव्यवहार आणि अनागोंदी कारभारामुळे अवसायनात गेले. दूध संकलन करून मोठ्या महानगरामध्ये पाठविण्याची जबाबदारी खासगी दूध प्रक्रिया केंद्रांनी घेतली. जिल्ह्यात दररोज 50 हजार लिटर पेक्षा जास्त दूध संकलन करून प्रक्रिया करणारे अनेक मोठे प्रकल्प आहेत. या दूध प्रक्रिया प्रकल्पांकडे स्वतःची सुसज्ज प्रयोगशाळा असून सर्व तपासण्या करणे त्यांना बंधनकारक आहे. दररोज 8 ते 10 हजार लिटर दूध संकलन करणारी 200 पेक्षा अधिक संकलन केंद्रे आहेत. तेथून दूधसंस्थांकडे दूध पाठवण्यात आल्यानंतर टोन्ड दुधाच्या नावाखाली त्यात भेसळ केली जाते. मूळ दुधात भरपूर पाणी मिसळून मग ते घट्ट करण्यासाठी त्यात दुधाची पावडर, मक्याचा स्टार्च, भेंडीची पावडर असे घटक मिसळले जातात, असे दूध धंद्यातील जाणकार सांगतात. टोन्ड दुधाच्या नावाकाली ही भेसळ राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे मूळ दुधाची चव पूर्णपणे बदलून जाते. पण, हे तपासण्याची यंत्रणा जाणीवपूर्वक झोपा काढत असल्याने भेसळ करणार्‍यांचे फावत आहे. 

भेसळीपासून शेतकरी दूर 

Rate Card

सध्या दुधाला स्निग्धांशावर (फॅट) आधारित दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी आता भेसळीपासून दूर गेला आहे. दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रावर दूध आणतात. पण, त्यापुढे टोन्ड दुधाच्या नावाखाली त्यात पावडर व इतर घटक मिसळले जातात. नैसर्गिक चव हरवलेले हे दूध शहरांतील हॉटेलांत चहा व इतर पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जात आहे. कारण ते पिण्यासाठी ग्राहक वापरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.वाहनांच्या उपलब्धतेमुळे दूध भेसळीतील गैरप्रकारांना प्रतिबंध निर्माण झाला आहे. खाजगी दूध संकलन करणारे गावोगाव वाहने घेऊन शेतकर्‍यांकडून दुधाचे संकलन करतात. संकलित केलेले दूध परिसरातील दूध शीतकरण केंद्रावर आणले जाते. त्यामुळे दूध थंड राहण्यासाठी युरियाची भेसळ करण्याचे प्रकार थांबले असल्याचा दावा अन्न-औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, यातील ’अर्थ‘शास्त्र पाहता त्यावर कोणीच विश्‍वास ठेवत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.