दुष्काळाशी सामना करण्यास प्रशासन सज्ज ; प्रांताधिकारी तुषार ठोंबरे | तुकाराम महाराज यांचा उपक्रम स्तुत |

0

येळवी,वार्ताहर : जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला आहे. दुष्काळाशी सामना करण्यास प्रशासन सज्ज आहे.जत तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यास प्रशासनाने तयारी केली असून सामाजिक संस्थेने चारा छावणी सुरू करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.

जत तालुक्यातील गोधळेवाडी येथील मठात चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी सुरू केलेल्या मोफत चारा छावणीस प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी भेट दिली.त्याचबरोबर पत्रकार व प्रशासन संवाद कार्यक्रम संपन्न झाला. भेटीनंतर प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत दुष्काळाबाबतची संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेतली. 

प्रांताधिकारी तुषार ठोंबरे पुढे म्हणाले, म्हैसाळचे पाणी ज्या भागात पोहचले आहे त्या भागात दुष्काळाची दाहकता जाणवत नाही, पण ज्या ठिकाणी पाणी पोहचले नाही विशेषतः जत पूर्व भागात दुष्काळाचे चटके बसत आहेत. प्रशासनाने मागेल तेथे टँकर सुरू केले आहेत. टँकरच्या खेपा व्यवस्थित होतात की नाही हे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने पहावे. खेपा होत नसतील, गळके टँकर असतील तर प्रशासनाला तात्काळ कळवावे. चारा छावण्या संदर्भात प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत.पण शेगाव व अन्य काही गावे वगळता छावणीसाठीचे प्रस्ताव आलेले नाहीत. सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घ्यावा. मागणी व प्रस्ताव येताच तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.

यावर्षीचा दुष्काळ हा शेवटचा भीषण दुष्काळ ठरावा, यासाठी म्हैसाळचे पाणी जत पूर्व भागात येणे गरजेचे आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. आचारसंहिता संपताच आपण स्वतः पुढाकार घेवून अधिकाऱ्यासह लोकसहभागातून असे प्रश्न मार्गी लागतील का हे पाहून निर्णय घेवू.वरिष्ठाना तसे प्रस्ताव पाठवू. पाण्याच्या विषयावरून मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा न बोलता मतदानाचा पवित्र हक्क बजावा असे आवाहन प्रांताधिकारी ठोंबरे यांनी केले.

Rate Card

दरम्यान मोफत चारा छावणीचा उपक्रम आदर्शवत ; दरवर्षी दुष्काळ पडतो पण यावर ठोस उपाययोजना आपण करत नाही. प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्ष संगोपन मोहीम हाती घेतली पाहिजे. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून पाणी अडविले पाहिजे. जल चळवळ उभा केली पाहिजे असे घडले तरच जतचा दुष्काळ कायमचा हटेल. चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी स्वखर्चातून चारा छावणी सुरू करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांचा आदर्श समाजातील दानशूर मंडळींनी घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी ठोंबरे यांनी केले.

दुष्काळग्रस्तांना बळ द्यावे- तुकाराम महाराज

चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत बोलताना तुकाराम महाराज म्हणाले की, जतमधील दुष्काळ हा भयावह आहे. या दुष्काळावर मत करण्यासाठी आम्ही प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.ज्या ठिकाणी प्रशासन कमी पडेल त्याठिकाणी आम्ही ताकतीने प्रशासनाच्या पाठीशी उभा राहू. प्रशासनाने दुष्काळग्रस्तांना बळ द्यावे असे आवाहन तुकाराम महाराज यांनी केले.

मठाधिपती तुकाराम महाराज यांनी सुरू केलेल्या चारा छावणीस प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.