विशेष पथकाची कारवाई
जत,प्रतिनिधी : डफळापूर (ता.जत)येथे बुवानंद मंदिरालगतच्या वाड्यात अनेक दिवसापासून खुलेआम सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या विशेष पथकाने छापा टाकला.त्यात आठ जुगाऱ्यासह 1 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जुगार चालक कुमार कांबळे (रा.आंबेडकर नगर,जत) बाळासो पाटील,बापू मलमे,सुनील मलमे,पोपट पाटोळे,कैलास पाटोळे,रमेश भोसले,(सर्व रा.डफळापूर),रमेश मंडले(रा.कुडणूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. जत पश्चिम भागातील डफळापूर येथे जत पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कृपा आशीर्वादाने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत.मटका,जुगार अड्डे, बेकायदा दारू,सिंदी यासारखे अवैध धंदे अगदी मध्यवर्ती चौक, स्टँड परिसर,धार्मिक मंदिरालगत,सार्वजनिक चौकात खुलेआम सुरू आहेत.याकडे पोलीसाचे लक्ष नाही,जत पोलिसात तक्रार करूनही कारवाई होत नाही,असे आरोप आहेत.त्यामुळे काही नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.त्यानुसार सोमवार तारीख 25 रोजी दुपारी तीन वाजता विशेष पथकाने डफळापूर येथील बाळासाहेब पाटील यांच्या वाड्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.त्यावेळी आठ जुगारे तीन पानी पत्त्यावर पैसे लावून खेळत होते. पथकातील पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडील रोख रक्कम 9,920,आठ मोबाईल,दोन मोटरसायकली,पत्ते असा 1 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यात घेतलेल्या जुगार अड्डा चालकासह आठ जुगाऱ्यांना लेखी बॉडवर रात्री उशिराने सोडून देण्यात आले.जत पश्चिम भागातील बेधडक चालू असलेले धंदे यापुढे तरी बंद होणार का ? असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे.गावात खुलेआम मटका,बेकायदा दारू,जुगार अड्डा सुरू आहेत.अगदी प्रमुख चौकात बसून मटका घेतला जात आहे.अनेक वेळा कारवाया होऊनही राजरोसपणे मटका सुरू आहे.त्यामुळे नेमका पोलीस प्रशासना धाक नसल्याचा आरोप होत आहे.