56 लाख युवकांना बेरोजगार करण्याचे पाप भाजपने केले माजी मंत्री: जयंत पाटील
जत, प्रतिनिधी:दरवर्षी देशातील 2 कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे गाजर दाखवून सत्तेवर आलेल्या मोदीसाहेबांनी 3 वर्षात 6 कोटी युवकांना नोकऱ्या दिल्या का? उलट त्यांच्या नोटबंदी सारख्या निर्णयाने देशातील 56 लाख युवकांना बेरोजगार व्हावे लागले आहे,या शब्दात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी जत येथील जाहीर सभेत टिका केली. स्व.मदनभाऊ पाटील यांनी हॉस्पिटल असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मीच त्यांना अगोदर बरे व्हा,नंतर बघू,असा सल्ला दिला होता. मात्र त्यांचे अकाली निधन झाले,असेही त्यांनी सांगितले.जत बाजार समितीचे माजी सभापती,जतचे मातब्बर नेते सुरेशराव शिंदे (सरकार) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येथील थोरल्या वेस चौकातील भरगच्च जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आ.पाटील यांनी पुष्पहार घालून त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अँड. बसवराज दोडमनी,माजी जि.प.सदस्य रमेश पाटील,अँड.चनाप्पा होर्तीकार,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष पै.ताजुद्दीन तांबोळी, महिला जिल्हाध्यक्षा सौ.छायाताई पाटील,युवक तालुका अध्यक्ष उत्तम चव्हाण,अविनाश वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,जनतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपा शासनाशी दोन हात करू शकतो. हा विश्वास जनतेला आहे. सत्ताधारी भाजपच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिंदे सरकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ते सामान्य जनतेच्या सुख दुःखाशी समरस झालेले नेते आहेत. म्हणूनच गेली 25-30 वर्षे ते जतचे नेतृत्व करीत आहेत. जत शहर व तालुक्याच्या विकासाबरोबर सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही त्यांना ताकद देवू. या शहराच्या प्रगतीसाठी आम्हीच सर्वात प्रथम 25:15 मधून मोठा निधी दिला असून कृष्णा खोऱ्याच्या कामास गती दिली आहे. मात्र आजचे सरकार फक्त आकड्यांचा खेळ करून जनतेची दिशाभूल करीत आहे. या सरकारने जनतेचा भ्रम निराश केला आहे.
फोटो ओळी-जतचे मातब्बर नेते सुरेशराव शिंदे (सरकार) यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील. समवेत रमेश पाटील,अँड.चनाप्पा होर्तीकर,बसवराज दोडमनी,बाळासाहेब पाटील,भरत देशमुख,पै.ताजुद्दीन तांबोळी मान्यवर.
सुरेशराव शिंदे म्हणाले,स्व.मदनभाऊंनीच राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असल्याचे सांगितले होते. गटा-तटाच्या व पै-पाहुण्यांच्या राजकारणाने काँग्रेस पक्ष संपत चालला आहे. आम्ही प्रतीक पाटील व विशाल पाटील यांच्याशी बोललो आहे.आम्ही पुन्हा एकदा राष्ट्रवादीस गतवैभव मिळवून देवू. जत नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेलच,तसेच येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत 50 टक्केपेक्षा जादा ग्रामपंचायती निवडून आणू. भविष्यात कधी मी राष्ट्रवादी सोडली,तर तो माझ्या राजकीय संन्यासाचा दिवस असेल.
माजी जि.प.सदस्य रमेश पाटील,अँड.बसवराज दोडमनी यांनी तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत झाल्याची भावना व्यक्त केली. तर महिला जिल्हाध्यक्षा सौ.छाया पाटील,युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पै.ताजुद्दीन तांबोळी,जिल्हा अध्यक्ष भरत देशमुख यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर प्रहार चढविला.
उपसभापती शिवाजीराव शिंदे,नगरसेविका सौ.हेमलता चव्हाण,माजी जि.प.सदस्य राजू खाडे,सोसायटीचे चेअरमन गोपाळ साळे,प्रा.हेमंत चौगुले,दलित महासंघाचे प्रकाश देवकुळे,बाजीराव केंगार,अशोक कांबळे,शेगावचे संभाजी पाटील,आप्पासो कोळी, महंमद नदाफ,पापा हुजरे,डॉ.पराग पवार,राजू इनामदार यांच्यासह जत शहर व तालुक्यातील पदाधिकरी व कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
युवक तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी स्वागत केले.याप्रसंगी सिद्धआण्णा शिरसाट,श्रीमती विमलताई कोळी,सुवर्णाताई अलगुर, जे.के.माळी,शंकर गायकवाड यांच्यासह जत शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसवराज चव्हाण यांनी आभार मानले.

जिद्दी व ताकदवान नेता
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेले असतानाही आ.जयंतराव पाटील यांनी स्वतःच्या हिमतीवर जिल्हा परिषद निवडणुकीत 18-20 जागा निवडून आणल्या. काँग्रेसमधील कोणी नेता भाजपात गेलेला नसतानाही काँग्रेसला 7-8 जागा निवडून आणताना नाकीनऊ आले. पक्षाने याचा गंभीरपणे विचार करायला हवा. आ.जयंतराव पाटील हे जिद्दी व ताकदवान नेते आहेत.