महागाईचा तीव्र निषेध
मुंबई;देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले. भाजीपाला महागला, जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. त्याला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारबद्दल देशभरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद उद्या आर्थिक राजधानी मुंबईत उमटणार आहेत.
महागाईचा तीव्र निषेध करत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरणार आहेत. मोर्चे, आंदोलनांनी मुंबई ढवळून निघणार आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात सरकारच्या निषेधाचे नारे गुंजणार आहेत.मुंबईच्या कानाकोपऱ्यात उद्या शिवसेनेचे मोर्चे निघणार आहेत. अनेक ठिकाणी निषेध आंदोलने होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मुलुंडपर्यंत, चर्चगेटपासून दहिसरपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागामधील आबालवृद्धांसह हजारो नागरिक त्यात सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे आंदोलन असल्यामुळे उद्या अवघी मुंबईच रस्त्यावर उतरणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे मोर्चे, आंदोलने सुरू होणार आहेत. जनसामान्यांचा संताप या आंदोलनाच्या रूपात तीव्रपणे रस्त्यावर व्यक्त होणार असल्याने सरकारही हादरले आहे. मोर्चांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे