तब्बल ९ वर्षानंतर तुडुंब भरले जायकवाडी धरण
औरंगाबाद – गुरुवारी रात्री ११ वाजता मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडून गोदावरी नदी पात्रामध्ये १० हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. तब्बल ९ वर्षानंतर सतत दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात जायकवाडी धरण भरल्याने यंदा हे पाणी सोडण्यात आले.
धरणातील पाणीसाठा सध्या ९७ टक्के झाला आहे. शिवाय औरंगाबाद जिल्हा, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या पाण्याची आवक सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडीच्या २७ पैकी १८ वक्र दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. हे पाणी सोडल्यानंतर औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाच्या पाणीसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात महिनाभरात वाढ झाली. यापूर्वी जायकवाडी धरणातून २००८ या वर्षांमध्ये १ लाख क्यूसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आले होते. त्यापूर्वी २००६ मध्ये अडीच लाख क्यूसेक इतक्या वेगाने पाणी सोडले असताना अनेक गावांना पुराने वेढले होते. यंदा पाऊस अधिक वाढला तर अचानक वेगाने विसर्ग करणे टाळण्यासाठी ९७ टक्क्यांवर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मध्यरात्री घेतल्यानंतर सर्वच विभागांनी कोठेही धोका निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे सुरू केले आहे