सदाभाऊंची नवी ‘रयत क्रांती संघटना’
कोल्हापूर- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर आज स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. सदाभाऊंच्या नव्या पक्षाचे नाव ‘रयत क्रांती संघटना’ असे आहे. त्यांनी आपल्या संघटनेची घोषणा शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतीक हॉलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
सदाभाऊ खोत यांनी यावेळी आयोजित मेळाव्यात मला नेता म्हणून नाही, तर कार्यकर्ता म्हणून जगायचे आहे. मला कुठलीही दुकान चालवायची नसून शेतकऱ्याला चालवायचे आहे, अशी भुमिका मांडली. आता खळ्याचा मालक रयतच असणार आहे. उसाचा भाव दसऱ्यालाच जाहिर करू असेही यावेळी बोलतांना सदाभाऊ म्हणाले.

दरम्यान संघटनेच्या स्थापनेसाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रकृती कार्यक्रमापूर्वीच काही काळ अचानक बिघडली. त्यांना शहरातल्या शासकिय विश्राम ग्रहावर चक्कर आली. त्यांना ही चक्कर दररोजच्या धावपळीमुळे आलेल्या थकव्यामुळे आल्याचे सांगण्यात आले. काही वेळातच ते सावरले. त्यांची प्रकृती ठीक आहे असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.