तासगावच्या तहसीलदारपदी रवींद्र रांजणे | वाळू चोरी, बेकायदा मुरूम वाहतूक रोखण्याचे ‘आव्हान’: लोकाभिमुख काम केल्यास निरोपावेळी नागरी सत्कार

0
तासगाव : तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या बदलीनंतर गेल्या आठवडाभरापासून हे पद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे तासगावकरांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, रवींद्र रांजणे यांची पदोन्नतीने तासगावच्या तहसीलदारपदी नियुक्तीचा आदेश निघाला आहे. रांजणे यांच्यासमोर तालुक्यातील येरळा आणि अग्रणी नदीतील वाळू चोरी रोखणे, बेकायदा मुरूम वाहतुकीला पायबंद घालणे, ही प्रमुख आव्हाने असतील.
       शिवाय लोकाभिमुख काम करून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांना करावे लागेल. गोरगरीब, शोषित, वंचित घटक केंद्रबिंदू मानून काम केल्यास तालुक्यातील जनता कोणत्याही अधिकाऱ्याला डोक्यावर घेते, असाच आजवरचा अनुभव आहे. मात्र पदाचा, अधिकाराचा माज दाखवल्यास येथील जनता ‘त्या’ अधिकाऱ्याच्या बदलीनंतर फटाक्यांची आतषबाजी करते, हा अनुभव नुकताच आला आहे. त्यामुळे रांजणे यांनी सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम केल्यास तासगावचे लोक नागरी सत्काराने त्यांना निरोप देतील. अन्यथा त्यांच्या बदलीनंतर फटाक्यांची आतषबाजी ठरलेली आहे. त्यामुळे बदलीनंतर निरोप कसा घ्यायचा, ते रांजणे यांना आताच ठरवून काम करावे लागेल.
      रांजणे हे मुळचे जावळी तालुक्यातील दापवडी गावचे आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असताना स्पर्धा परीक्षेतून त्यांची नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. आतापर्यंत त्यांनी वाई, दहिवडी, कोरेगाव याठिकाणी नायब तहसिलदार म्हणून काम केले आहे. सध्या ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची पदोन्नतीने तासगावच्या तहसीलदारपदी नेमणूक झाली आहे. तत्कालीन तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या जागी ते काम करतील.
     ढवळे यांच्या कार्यपद्धतीवर तालुक्यातील जनता नाराज होती. त्यांना आपल्या कारकिर्दीत लोकाभिमुख काम करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर शहरातील काहींनी तहसील कार्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीनंतर फटाक्यांची आतषबाजी होण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकार होता.
Rate Card
      यापूर्वी तालुक्यात अनेक तहसीलदार होऊन गेले. मात्र कोणाच्याही बदलीनंतर अशाप्रकारे फटाक्यांची आतषबाजी झाली नाही. उलट ज्या – ज्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केले त्यांना जनतेने डोक्यावर घेतले. या अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर तासगावच्या जनतेने निरोप समारंभाचा कार्यक्रम घेत त्यांचा नागरी सत्कार केला. तत्कालीन तहसीलदार सुधाकर भोसले, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे या जोडगोळीला तर तालुक्यातील जनतेने डोक्यावर घेतले होते. या दोघांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच या दोघांच्या बदलीनंतर नागरिकांनी त्यांचा नागरी सत्कार केला होता.
      दरम्यान, आता कल्पना ढवळे यांच्या जागी रवींद्र रांजणे हे पदभार स्वीकारत आहेत. वाळू, मुरूम तस्करी रोखण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांना करावे लागेल. शिवाय तहसील कार्यालयातील काहींनी दुकानदारी सुरू केली आहे. ही दुकानदारी मोडीत काढण्याबरोबरच या कार्यालयातील बोगस लोकांना हाकलण्याचे काम रांजणे यांना करावे लागणार आहे.
        त्यांनी जर चांगल्या पद्धतीने काम करून सर्वसामान्यांच्या मनात घर केले तर बदलीवेळी त्यांचा नागरी सत्कार करून तासगावकर त्यांना निरोप देतील. अन्यथा फटाक्यांची आतषबाजी ठरलेली आहे. त्यामुळे बदलीनंतर निरोप कसा घ्यायचा, ते रांजणे यांना आताच ठरवावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.