जत : माडग्याळमध्ये म्हैसाळचे पाणी देता यावे यासाठी चर काढण्याचे काम सुरू झाले होते मात्र वन विभागाच्या हद्दीतून ही चर काढली जात असल्याने वन अधिकाऱ्यांनी ती दुसऱ्यादिवशी अडवत काम थांबविल्याने शेतकऱ्यांनी टाहो फोडला,अधिकाऱ्यांचे पाय धरले.साहेब, राजकारण करू नका, आमच्या पाण्याला आडवू नका, आम्ही म्हैसाळचे पाणी येतय म्हणून गेली ४० वर्षे वाट पाहतोय, आम्हाला आत्महत्येची वेळ आणू नका, आम्हाला जगू द्या,अशी विनवणी जत तालुक्याच्या दुष्काळी माडग्याळ भागातील शेतकर्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
पाण्यासाठी आसुसलेल्या उपस्थित शेतकर्यांनी वन अधिकार्यापुढे हात जोडत टाहो फोडून साहेब काम थांबवू नका असा आग्रह धरत असतानाच काही शेतकर्यांना रडू कोसळले.तरीही वन विभागाने वन जमिनीतून चर काढण्यास मज्जाव केला असून या परिसरातील ४०० शेतकरी माडग्याळच्या माळावर ठिय्या मारून बसले आहेत. वन अधिकारीही वरिष्ठ पातळीवरून काही मार्ग निघतो का यासाठी फोनाफोनी करीत आहेत.दरम्यान वन अधिकारी व शेतकरी एकमेकांच्या मतावर ठाम असल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.