उमदी येथे अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर

0
0

– जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी*

समता अनुदानित आश्रमशाळा, उमदी (ता. जत) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत व सर्वोत्तम उपचाराबाबत जिल्हा व आरोग्य प्रशासन सतर्क आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली व धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांची मिरज वैद्यकीय महाविद्यालयास भेट

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भेट देऊन, तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच, जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ येथील रूग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कसूर ठेवू नये, अशा सूचना आरोग्य प्रशासनास दिल्या.

 

विद्यार्थ्यांवर चार ठिकाणी उपचार
समता अनुदानित आश्रमशाळा, उमदी (ता. जत) येथील विद्यार्थ्यांना दि. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने उलटी, जुलाब अशी लक्षणे दिसून आली. या मुलांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयामध्ये दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली व धोक्याबाहेर असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

 

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जत ग्रामीण रूग्णालय येथे 81 विद्यार्थी, ग्रामीण रूग्णालय, माडग्याळ येथे 21, ग्रामीण रूग्णालय, कवठेमहांकाळ येथे 41 आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरज येथे 26 अशा एकूण 169 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. 24 तास विद्यार्थ्यांना वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या मुलांच्या उपचारावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल विद्यार्थ्यांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.

हेही वाचा..गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिला उमदी घटनेतील विद्यार्थ्यांना धीर

 

घटनेचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना

दरम्यान, या घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना सहायक आयुक्त, समाजकल्याण यांना दिल्या आहेत. चौकशीअंती दोषींवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना

जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे प्रमुखांनी मुलांना आहार देताना व शिजवताना अत्यंत काळजीपूर्वक, सतर्क राहून स्वच्छ, पोषक, आरोग्य दायी व भेसळमुक्त आहार देण्याची खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रूग्णालय स्तरावर पथके गठीत करून वसतिगृहे व आश्रमशाळेची ‍नियमित तपासणी करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. वसतिगृहे व आश्रमशाळा प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आहार देताना नेहमीच योग्य ती खबरदारी घ्यावी. यापुढे असा अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here