सांगली : सध्याच्या पुणे-बंगळुरू रोडला पर्याय व अंतर कमी करण्यासाठी नव्याने होत असलेल्या पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून जाणाऱ्या पुणे-बंगळुर हरित महामार्गाचा (ग्रीनफिल्ड कॉरिडॉर) प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला लवकरच सादर होणार आहे.केंद्र शासनाच्या भारतमाला प्रकल्पातून या महामार्गाचे काम केले जाणार असून या कामासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यातून हा बहुचर्चित महामार्ग जाणार आहेत.या नव्या महामार्गामुळे ९३ किलोमीटरने अंतर होणार आहे.त्याचबरोबर पुणे-बंगळूरला जाणाऱ्या प्रवाशाचा वेळ दोन तासानी कमी होणार आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून महामार्गाचा प्रवास होणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ या तालुक्यातून या महामार्गाचा प्रवास होणार आहे.जिल्ह्यात त्यासाठी भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे.यानिमित्ताने सांगली जिल्ह्याला चौथा राष्ट्रीय महामार्ग मिळणार आहे. खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या गावांतून जाईल.
तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाणमधून महामार्ग जाईल.
कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळीमध्ये भूसंपादन होईल. मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या गावांचाही महामार्गात समावेश आहे.जिल्ह्यातील दुष्काळी तालुके यामुळे विकासाच्या टप्यात येणार आहेत.