सांगली : सांगली महापालिकेत शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा देऊन महायुती झाली तर ठीक नाहीतर शिवसेना म्हणून लढायची तयारी ठेवावी अशी सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी सांगलीत केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (शिंदे) पक्षातील इच्छुक व पदाधिकारी यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी मंत्री देसाई बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सन्मानपूर्वक युती करायला काही अडचण नाही. आम्ही महायुती करूनच निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र महायुतीत जागा लढवताना योग्य सन्मान आणि सन्मानपूर्वक जागा वाटप झाले पाहिजे. सांगली महापालिका मधील जागावाटपाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू. मात्र आपल्याला जर कुणी तुच्छ लेखत असेल तर मात्र स्वतःच्या ताकदीवर लढायची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी.
मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आरोप करताना मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला.अंधारे यांनी सातारा येथे अमली पदार्थ निर्मिती कारखाना हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतघराजवळ असल्याचा आरोप केला आहे.
एकनाथ शिंदेच्या भावावर आरोप केला आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले,अंधारे एका अब्रुनुकसानीच्या दाव्यामध्ये सामोरे गेल्या आहेत. त्यांनी बेछूटपणे आरोप करू नयेत. आरोप करताना मर्यादा पाळावी नाहीतर पुन्हा एकदा अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे लागेल. उद्धव राज ठाकरे एकत्र आल्याचा मुंबईत महायुतीवर परिणाम होणार नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १५ वर्षापूर्वी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते. त्यातील काही गोष्टी त्यांना आता आठवत असतील असा टोलाही त्यांनी लगावला.यावेळी आमदार सुहास बाबर,चंद्रहार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.




