अवयवदानातून तिघांना जीवनदान | हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत

0
5

मृत्यू हे अंतिम सत्य असले तरी अवयवदानामुळे व्यक्ती मृत्यूनंतरही जिवंत राहते, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. हरिपूर येथील दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी (वय 69) यांच्या अवयवदानामुळे नाशिक येथील दोन व सांगली येथील एका अशा एकूण तिघांना नवे जीवन लाभले. जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशील व तत्पर समन्वयामुळे ही प्रक्रिया यशस्वी ठरली.

दीपक धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाल्याने 16 डिसेंबर रोजी उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मेंदूमृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुःखद क्षणी पत्नी दीपा, कन्या डॉ. श्रेया व चिरंजीव अभिनंदन धर्माधिकारी यांनी कुटुंबीयांच्या सहमतीने अवयवदानाचा मानवतावादी निर्णय घेतला. त्यानुसार यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, डोळे व त्वचेचे दान करण्यात आले.

अवयवदानात वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक परवानग्या, सुरक्षा व वाहतूक व्यवस्था तातडीने करण्यात आली. यकृत ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवघ्या 25 मिनिटांत कोल्हापूरला व तेथून विशेष विमानाने दीड तासांत नाशिकला पोहोचवण्यात आले. एक मूत्रपिंड नाशिकला पाठवण्यात आले, तर दुसरे उषःकाल रुग्णालयातील रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. डोळ्यांचा कॉर्निया अनुराधा आय हॉस्पिटलला व त्वचा सुश्रुत प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटलला पाठवण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत उषःकाल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारीख यांच्यासह वैद्यकीय पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले असून, दीपक धर्माधिकारी यांचे आयुष्य संपले असले तरी त्यांच्या मानवतावादी निर्णयामुळे ते अवयवरूपी अजरामर झाले आहेत.

हरिपूरचे दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, डोळे व त्वचा नाशिककडे घेऊन जाणाऱ्या वैद्यकीय पथकासह जिल्हाधिकारी अशोक काकडे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here