पदवीधर निवडणूक ; महायुक्तीच्या उमेदवारापासून रिपाइं अलिप्त राहणार | जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची माहिती
जत,प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली असलीतरी ही उमेदवारी जाहीर करताना भाजपने सांगली जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला विचारात घेतले नाही.त्यामुळे पदवीधर निवडणूकीपासून रि.पा.इं.अलिप्त राहाण्याचा विचार करित आहे,अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली आहे.
कांबळे म्हणाले की, यावेळची पदवीधर निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे.या निवडणुकीत सर्व पक्षानी आपआपले उमेदवार घोषीत केले आहेत ही निवडणूक प्रथमच अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार असल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपा बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राष्ट्रीय पातळीवर युती असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब यांना पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेतेमंडळी हे सन्मानाची वागणूक देतात.परंतु सांगली जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व हे आमच्या पक्षाचा वापर निवडणुकीच्या कामासाठीच करून घेत असून निवडणूका संपल्या की ते आमच्या पक्षाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे.
कांबळे म्हणाले,सांगली जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रीयेत विचारात घेत नाहीत. जिल्हास्तरावरील तसेच तालुकास्तरावरील निवडीत आम्हाला जाणीवपूर्वक डावलले जाते.खासदार निधी वाटप करताना आमच्या पक्षाला विचारात घेतले जात नाही.जिल्हा परिषद,पं.स.,बॅंका,मार्केट कमिटी आदी ठिकाणी आम्हाला डावलले जात आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय होत आहे.
पुणे पदवीधर निवडणूकीत उमेदवार म्हणून संग्राम देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली असलीतरी या निर्णय प्रक्रीयेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली यांना विचारात न घेतल्याने याबाबत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांच्याकडे तक्रार केली असून पुणे पदवीधर संदर्भात जो काही निर्णय घेण्याचा असेल ते ना.आठवले घेतील असेही कांबळे म्हणाले.