सांगली : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला वगळून महायुतीकडून लढवली जाण्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिले.तसेच सांगलीचा महापौर भाजपचाच होणार, हे जणू विधिलिखित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या सुकाणू समितीची बैठक झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून माध्यमांशी संवाद साधताना पाटील बोलत होते. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवाव्यात, ही आमची भूमिका कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटासोबत चर्चा झाली असली तरी सांगलीतील गेल्या दोन दिवसांतील त्यांच्या हालचाली पाहता ते महायुतीमध्ये सहभागी होतील, याची सध्या खात्री देता येत नाही. मात्र, राजकारणात कधीही काहीही घडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार महायुतीतील घटक पक्ष, विशेषतः शिवसेना (शिंदे गट) व रिपाइ यांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या जात आहेत.याशिवाय स्थानिक पातळीवर जनसुराज्य शक्ती पक्ष व रयत क्रांती संघटना यांनाही महायुतीत सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिवसेना (शिंदे) गटासाठी काही जागांबाबत लवचिक भूमिका ठेवण्याचे आदेश अमित शहा यांनी दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
महायुतीतील अन्य घटक पक्षांच्या प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा झाली असून त्यांनी जागा मागणीसह संभाव्य उमेदवारांची यादी सादर केली आहे. यावर सुकाणू समिती निर्णय घेणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रभागांचा सर्व्हे करण्यासाठी ‘सागार’ कंपनीची नियुक्ती केली असून, त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होणार आहे. सर्व्हेमध्ये प्राधान्यक्रमानुसार तीन नावे असतील, त्यापैकी अंतिम उमेदवाराच्या नावाला सुकाणू समितीची मान्यता घेऊन प्रदेश समितीकडे यादी पाठवण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी ३० डिसेंबरअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे.
सांगली महापालिका निवडणुकीसाठी शेखर इनामदार यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्यावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतुल भोसले हे पक्षाचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिल्याबाबत विचारले असता, पाटील म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. एका कुटुंबातील सर्व व्यक्ती एकाच विचाराने वागत नाहीत, मग राष्ट्रवादीला एकाच चौकटीत बांधणे कितपत योग्य ठरेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महापालिका निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी राजकारणात काहीही घडू शकते, असे सांगत पाटील यांनी संभाव्य राजकीय समीकरणांकडे सूचक इशारा दिला.




