चित्रपट : भविष्याची ऐशी तैशी ,,,
चित्रपट : भविष्याची ऐशी तैशी ,,,
भविष्य हा विषयच नेहमी कुतूहल आणि उत्सुकता घेऊन आलेला आहे. भविष्याकडे पाहणे, आपले पुढे कसे होईल याची चिंता प्रत्येकाला असतेच, त्यामुळे प्रत्येकजण दररोज वृत्तपत्रात भविष्याचे सदर बघतोच, त्याचा विश्वास असो किंवा नसो त्याची नजर तिथे जातेच. आपले पुढील जीवन चांगले जावे हि मनोकामना प्रत्येकाला असतेच.

भविष्य ह्या विषयावर निर्माते रमेश तलवारे यांनी त्यांच्या रमेश तलवारे मुव्हीज तर्फे ” भविष्याची ऐशी तैशी ” ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. कथा सौ चंद्रा रमेश तलवारे यांची असून दिगदर्शन सुरेंद्र वर्मा यांचे आहे. ह्या सिनेमाच्या संगीत प्रकाशनाचा सोहळा नुकताच साजरा झाला. सिनेमाचे संगीत सलील अमृते यांनी दिले असून गीते सौ चंद्रा रमेश तलवारे यांची आहेत. यावेळी बोलताना रमेश तलवारे म्हणाले कि सिनेमाचा विषय हा ज्योतिषाशी जोडला गेला आहे, हा एक ” ऍस्ट्रोलॉजी थ्रिलर ” आहे. ह्या सिनेमात प्रिया, मेघा, निशी ह्या तीन मैत्रिणीची कथा असून मेघा चा ज्योतिषावर विश्वास आहे, प्रियाला हे सारे थोतांड वाटत असते, निशी ला तसे काहीच वाटत नाही तिचे कधी हो तर कधी नाही असे मत असते. ह्या तिघीजणी एकाच कंपनीमध्ये कामाला असल्याने त्या तिघीजणी एकत्रच एका फ्लॅट मध्ये राहत असतात. त्यांच्या जीवनात एक ” ज्योतिषी ” येतो आणि तो प्रियाचे असे काही भविष्य सांगतो त्यामुळे तिची घबराट होते, आणि पुढे नेमके काय होते ते म्हणजे ” भविष्याची ऐशी तैशी ” हा सिनेमा आहे.
संदीप कोचर हे स्वतः ज्योतिषी आहेत, ते भविष्य सांगतात आणि त्यांनी ह्या सिनेमात ज्योतिषाचीच भूमिका केली आहे, त्यांच्या भूमिकेचे नाव डॉ करमरकर हे असून असह्य व्यक्तीच्या मनाला उभारी देण्याचे काम डॉ करमरकर हे करीत असतात, व्यक्तीने अर्थात प्रत्येक माणसाने सकारात्मक विचार करायला पाहिजे आणि आशा सोडता कामा नये, असे ते सांगत असतात, ज्योतिष शास्त्राची सकारात्मकता ह्या मध्ये दाखवली आहे. ज्योतिष हे एक हजारो वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे, ह्या शास्त्राविषयी भाष्य करीत असताना तुम्ही सकारात्मक बना असेही हा सिनेमा सांगतो.
ह्या सिनेमात मानसी नाईक, रुचिता जाधव, हर्षाली झिने, स्वप्नील जोशी, संदीप कोचर, वर्षा उसगावकर, आसावरी जोशी, पंकज विष्णू,आनंदा कारेकर, प्रवीण तलवारे हे कलाकार आहेत.
दिनांक ६ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.