साताऱ्यात विनोद तावडेंच्या विरोधात घोषणाबाजी
सातारा – मल्हार क्रांतीच्या एका कार्यकर्त्याने सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला असतानाच या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी साताऱ्यातील कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे या कार्यक्रमात काही वेळ गोंधळ उडाला. पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.
आज तावडे साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास तावडे यांनी अभिवादन केल्यानंतर मल्हार क्रांतीचा कार्यकर्ता मारुती जानकर याने अचानक तावडे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याने ‘विनोद तावडे मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्याने केली. यावेळी नगरसेवक धनंजय जांभळे आणि विठ्ठल बलशेटवार यांनी जानकरला रोखले. दरम्यान, पोलिसांनी जानकर याला ताब्यात घेतले. दरम्यान, तावडे यांच्यावर बुक्का पडला नाही, असे रयत शिक्षण संस्थेने सांगितले.
