बुडणाऱ्या पुतणीला वाचवताना काकांसह दोघंही बुडाले; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना

पाणी आणताना पाय घसरून विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचवताना काका आणि पुतणी असा दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणधुळगाव येथे घडली आहे.या घटनेत माजी सैनिक असलेले मनोज भास्कर शेसवरे (वय ४३) आणि सौंदर्या वैभव शेसवरे (१६, दोघेही रा. अग्रण धुळगाव)हे मृत्त झाले आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. कवठेमहांकाळ पोलिसात घटनेची नाेंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेल्या सौंदर्या व तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. मायलेकी दोघीही विहिरीत उतरल्या होत्या.विहिरीत कळशी घेऊन वर्ती येत असताना सौंदर्याचा पायरीवरून पाय घसरला आणि ती विहिरीत पडली.सौंदर्या विहिरीतील पाण्यात पडताच तिच्या आईने आरडाओरडा केला.
