विवाह संस्कारातील धार्मिक विधींचे महत्व न्यायालयाकडूनही अधोरिखित !

0

                  हिंदु विवाहामध्ये जर आवश्यक ते विधी झाले नाहीत, तर तो विवाह ग्राह्य धरता येणार नाही. असे विवाह निरर्थक समजले जातील. नोंदणी केली, तरी हे विवाह वैध रहाणार नाहीत; कारण हिंदु विवाहामध्ये सप्तपदीसारखे विधी अतिशय महत्त्वाचे आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला. न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. ‘वादविवादांच्या प्रकरणात असे विधी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  हिंदु विवाह हा एक संस्कार असून विवाहाला भारतीय समाजात एक महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा मिळायला हवा. तरुणांनी विवाहाचा विचार करतांना भारतीय समाजात विवाह संस्था ही किती पवित्र आहे, याचा विचार करायला हवा. हे सांगतानाच न्यायालयाने  विवाह म्हणजे नाच-गाणे, जेवणे, मद्य पिणे किंवा हुंड्यासह अनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण करण्याचा कार्यक्रम नाही. हा भारतीय समाजातील एक महत्त्वाचा समारंभ आहे. या समारंभाद्वारे स्त्री आणि पुरुष यांच्यात एक विशिष्ट नाते निर्माण होते, त्यांना पती-पत्नीचा दर्जा दिला जातो. या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. न्यायालयाच्या या निर्णयातून आणि त्यासंदर्भातील टिपणीतून हिंदू धर्मातील विवाह संस्कारातील विविध धार्मिक विधींचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  

             
हिंदू धर्मात १६ संस्कारांना विशेष महत्व आहे. त्यातील १५ वा संस्कार म्हणजेच विवाहसंस्कार. हा सर्वात महत्वाचा संस्कार समजला जातो. या संस्कारात केल्या जाणाऱ्या प्रत्येक विधीचे विशिष्ट महत्व असून हा संस्कार करताना पुरोहित त्या विधीचे महत्व उभयतांना सांगत असतात. विवाह म्हणजे केवळ दोन देहांचे मिलन नसून यानिमित्ताने दोन कुटुंबे, दोन मने एकमेकांशी जोडली जातात. देवाब्राह्मणांच्या साक्षीने पती पत्नी आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याचे, सुख दुःखात एकमेकांना साथ देण्याचे, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे वचन देतात. अग्निभोवती प्रदक्षिणा घालण्याआधी अर्ध्यदान करून होमाग्नी प्रज्वलित केला जातो. वधूचा हात हातात घेऊन वर या होमाभोवती मंत्रोच्चारासह प्रदक्षिणा घालतो. याच वेळी वधु सप्तपदी चालते.  अन्नलाभासाठी पहिले, ऊर्जेसाठी दुसरे, समृद्धीसाठी तिसरे, सुखसमृद्धीसाठी चौथे, उत्तम संततीसाठी पाचवे, विविध ऋतूंच्या सुखासाठी सहावे आणि मैत्रीच्या सहृदय नात्यासाठी वधू-वर एकत्रपणे सातवे पाऊल चालतात. याला सप्तपदी असे म्हणतात.  शुद्धतेचे आणि समृद्धीचे प्रतीक असलेले तूप आणि लाह्या वधू वर होमात अर्पण करतात. ईशान्य दिशा ही अपराजित दिशा असल्याने ईशान्य दिशेकडे जाणारी सप्तपदी यावेळी मांडली जाते. सप्तपदी चालल्यानंतर आकाशातील ध्रुव ताऱ्याला नमस्कार करून ध्रुव ताऱ्याप्रमाणे संसारात अचल राहण्याचे आणि आजन्म एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले जाते. पाणीग्रहणानंतर व्यक्तीच्या गृहस्थाश्रमाचा आरंभ होतो. पती पत्नीमधील शारीरिक संबंधांना केवळ वंशवृद्धिपुरते महत्व असून आत्मिक मिलनाला विशेष महत्व आहे. भावी आयुष्यात पती पत्नीने एकमेकांना पूरक राहण्याच्या दृष्टीने विवाह संस्कार अत्यंत महत्वाचा मानला जातो.  
           
विवाह संस्कारामध्ये श्री गणेश पूजन, सीमांतपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन, कन्यादान, मंगळसूत्र बंधन, अक्षतारोपण, मंगलाष्टके, विवाह होम, पाणिग्रहण, लाजाहोम, सप्तपदी, गर्भाधान असे अनेक विधी असतात. या प्रत्येक विधीच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र, केलया जाणाऱ्या कृती यामागे ऋषीमुनींचा संकल्प कार्यरत असतो, त्यामुळे या विधी भावपूर्ण होणे अत्यंत महत्वाचे असते. विवाह संस्कार म्हणजे उभयतांना केवळ सहचर्य करण्याची अनुमती देणारा संस्कार नसून भावी जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सांगड घालण्याची शिकवण देणारा संस्कार आहे. एकमेकांना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणारा संस्कार आहे. त्यामुळे हा विधी आणि संस्कार शास्रशुद्धरीतीने झाल्यास उभयतांचे भावी जीवन सुखकर, आरोग्यमय आणि समृध्दीमय होते अशी लोकांची श्रद्धा आहे. एकूणच विवाहसंस्कारात  नियोजित विधींना अधिक महत्व देण्यात आले आहे. 
Rate Card
               
सध्याचे विवाह पाहता स्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्याच्या घडीला विवाहातील धार्मिक विधींपेक्षा अन्य गोष्टींना आणि कृत्रिम अवडंबराला अधिक महत्व प्राप्त होऊ लागले आहे. विवाह संस्कारात अनेक अनिष्ट बाबींचा शिरकाव झाला आहे, ज्यामुळे विवाहातील मुख्य विधींनाच बगल दिली जात आहे.  विवाहासारख्या धार्मिक कार्यक्रमाचाही इव्हेन्ट होऊ लागला आहे, ज्यामुळे त्यातील सात्विकताच लोप पावू लागली आहे. राज्यासह देशातील विविध प्रांतात आणि समाजामध्ये विवाह जमवण्यासाठी आजही हुंडा दिला आणि घेतला जातो. हुंडाप्रथेला कायद्याच्या कक्षेत आणूनही यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. हुंडा देण्याघेण्यामध्ये दुर्दैवाने उच्चशिक्षित कुटुंबे अग्रणी असतात. हुंड्याच्या लोभामुळे केल्या गेलेल्या छळामुळे दरवर्षी कितीतरी नववधू आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. व्हाट्सअप आणि टेलिग्रामसारखी अद्यावत संपर्क साधने असताना आजही अनेक जण आत्मप्रौढीसाठी महागड्या पत्रिका छापतात. काही भागांत तर विवाहनिमित्त मोठमोठे बॅनर्स आणि होर्डिंग्सही लावले जातात. प्री वेडिंग फोटो आणि व्हिडीओ शूटसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. हे फोटो किंवा व्हिडीओ शूट पाहण्यामध्ये लग्नाच्या एक वर्षानंतर वधूवरांनाही फारशी रुची राहिलेली नसते. विवाहातील स्वागत समारंभासाठी महागडे कपडे शिवले जातात जे वधु वरांकडून भविष्यात खचितच वापरले जातात. हल्ली तर विवाह समारंभ संस्मरणीय करण्यासाठी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपन्यांना कंत्राट दिले जाते. या कंपन्या धार्मिक विधींपेक्षा सोहळा अधिकाधिक मनोरंजक आणि आकर्षक कसा होईल याकडे अधिक लक्ष देतात. यांच्याकडून विवाह विधी थोडक्यात आटोपण्याकरीता काहीवेळा पुरोहितांवर दबाव टाकला जातो. आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी याच कंपन्यांकडून वधु-वरांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे सिनेगीतांवर नृत्य बसवले जातात, विवाह विधीनंतर त्याचे विशेष सादरीकरण असते. स्टेजवर लोकांसमोर नाचायचे आहे, तर सर्व व्यवस्थितच व्हायला हवे यासाठी अनेक जवळचे नातेवाईक लग्नाच्या तयारीत हातभार लावण्यापेक्षा या नृत्याच्या तयारीतच अधिक व्यस्त असतात. विवाहाप्रित्यर्थ उपस्थितांना प्रीती भोजन दिले जाते. हे भोजन वधु वरांच्या कुटुंबाच्या ऐपतीनुसार दिले जायला हवे; मात्र इथेही आत्त्मप्रौढीसाठी भोजनात नको तितक्या पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. काही ठिकाणी भोजनासाठी शाकाहार आणि मांसाहार असे वेगवेगळे कक्ष उभारले जातात.
याशिवाय चायनीज, इटालियन पदार्थांचे कक्ष उभारण्याचीही पद्धत हल्ली रूढ होत चालली आहे. विवाहानंतर मंजुळ आवाजाच्या पारंपरिक वाद्यांनीशी वधु -वरांची वरात काढण्याची प्रथा लोप पावत चालली आहे. हल्ली वरातीसाठी डीजे, बेण्डबाजा आणि कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी हजारो रुपये उधळले जातात. याशिवाय मित्र मंडळींना मद्याच्या आणि मांसाहाराच्या मेजवान्या देण्यासाठी खर्च होतो तो वेगळाच. लग्न सोहळ्यासाठी खरेतर आपल्या ऐपतीप्रमाणेच खर्च केला जावा; मात्र ‘लोकांना काय वाटेल’ या विचाराने वर-वधूच्या कुटुंबियांकडून लग्न सोहळा दिमाखात पार पडावा यासाठी कर्ज काढून नको त्या गोष्टीसाठी नको तेव्हढा खर्च केला जातो. त्यामुळे विवाह संस्कारातील धार्मिक  विधी राहतात बाजूला आणि अनावश्यक बाबींसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. लग्नानंतर गृहस्थाश्रम आरंभ होतो. नवा संसार उभा करण्यासाठी जागोजागी धनाची निकड भासते; मात्र वधु-वरांची सुरुवातीची काही वर्षे लग्नासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच व्यय होतात. विवाह संस्कारामध्ये केवळ धार्मिक विधींना महत्व असून आपल्या इभ्रतीखातीर त्याला लावण्यात आलेल्या उपरोक्त बाबींचा मुलामा निव्वळ दिखाव्यासाठी असतो. आता तर न्यायालयानेच या अवडंबराची व्यर्थंता लक्षात आणून देऊन विवाहातील धार्मिक विधींचे महत्व पटवून दिले आहे. यानंतर तरी लोकांना जाग येईल का ?
 
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई 
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.