सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ मध्ये २३ लाख ७६ हजार ३०४ मतदार होते. यामध्ये गेल्या पाच वर्षांत एक लाख २६ हजार ६५० मतदारांची वाढ होऊन २०२४ च्या विधानसभेसाठी २५ लाख दोन हजार ९५४ मतदार झाले आहेत. पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हजार पुरुषामागे महिला मतदारांचा टक्का वाढून १००१ प्रमाण झाला आहे. सर्वाधिक सांगली विधानसभा मतदारसंघात तीन लाख ५१ हजार ६३१ तर सर्वांत कमी इस्लामपूर मतदारसंघात दोन लाख ७७ हजार ६७० मतदार आहेत.प्रभारी जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी नीता शिंदे- सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अंतिम मतदार यादीची माहिती दिली.
हरकतीनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. दि. ३० ऑगस्ट, २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम मतदारयादीत एक हजार पुरुषांमागे ९७२ महिला असे प्रमाण आहे. एक हजार पुरुषांमागे सर्वाधिक पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात १००१ महिला असून सर्वात कमी जत मतदारसंघात ९०७ महिला आहेत. मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंख्येत वाढ झाली आहे. आठ विधानसभेसाठी २५ लाख दोन हजार ९५४ मतदारसंख्या झाली असून त्यामध्ये १२ लाख ६९ हजार १५७ पुरुष, तर १२ लाख तीन हजार ४८७ स्त्री मतदारांचा समावेश आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ५१ हजार ६३१, तर कमी इस्लामपूर मतदारसंघात दोन लाख ७७ हजार ६७० मतदार आहेत.मतदार नोंदणीसाठी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेला नवमतदारांचा प्रतिसाद दिला होता. त्यानुसार १८ ते १९ वयोगटातील ५६ हजार ६५० नवीन मतदारांची नोंद झाली. दुबार नावासह मयत असे मिळून सात हजार ६१३ नावे वगळली, तर १५ हजार ३३ मतदारांच्या नावे, पत्ता, वय अशी दुरुस्ती केली आहे. याशिवाय ८५ वर्षांवरील ३७ हजार ८४८ तर शंभर वर्षांवरील एक हजार १७१ मतदारांचा समावेश आहे.