जतमधून लिंगायत समाजालाच भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी समाजाकडून दबाव वाढला आहे. लिंगायत समाज सन्मान यात्रेमुळे जतमध्ये लिंगायत पॅटर्न चर्चेत आला आहे. तर लिंगायत समाजाचे प्रबळ दावेदार म्हणून भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांचे नावही चर्चेत आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांची लिंगायत समाज सन्मान यात्रा काल जतमध्ये दाखल झाली. महाराष्ट्र राज्यातील लिंगायत समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे हा या यात्रेचा प्रमुख हेतू आहे. विशेषत: भाजपमधून लिंगायत समाजाचा उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विजयी होऊ शकतो, यांची चाचपणी केली जात आहे. त्यामध्ये जत तालुक्याचे नाव आघाडीवर आहे. खासदार गोपछडे यांनी तसे जाहीरही केले आहे. लिंगायत समाजाने एकत्र येऊन सक्षम उमेदवार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जत विधानसभेसाठी भाजपमधून जेष्ठ नेते व सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ रविंद्र अरळी तसेच भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा महामंडळाचे संचालक तम्मनगौडा रविपाटील यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांपैकी तम्मनगौडा रविपाटील यांचे पारडे निर्विवाद जड आहे. जनकल्याण संवाद पदयात्रमुळे तम्मनगौडा रविपाटील हे नाव घराघरात पोहोचले आहे. शिवाय विधानसभेसाठी त्यांनी प्रबळ दावेदार केली आहे.
डॉ रविंद्र आरळी हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तरीही आमदार गोपीचंद पडळकर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एकीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारीसाठी जंगजंग पछाडले आहे, अशातच लिंगायत पॅटर्नमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.