जत : वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जत तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. दररोज ७ ते ८ ट्रक लाकूड भरून जात आहेत. लाकूड वखारीचा धंदाही तेजीत सुरू आहे. परिणामी, तालुक्यातील वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वनप्रेमींतून वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग आहे. तालुक्यात केवळ ११३०५ हेक्टर वनक्षेत्र असून, केवळ ६ टक्के वनक्षेत्र आहे. सध्या ग्रामीण भागात शेत बांधावरील लिंब, चिंच, आंबा झाडांची तोड सुरू आहे. यासारख्या दररोज शेकडो जुन्या डेरेदार हिरव्या झाडांची कत्तल जोमात सुरू आहे. लाकूड इचलकरंजी, कोल्हापूर, विजापूर, चडचण भागात जाते. लाकडाची मुख्य रस्त्यावरून खुलेआम ट्रॅक्टर, टेम्पोद्वारे वाहतूक केली जात आहे. ताडपत्री झाकून वाहतूक केली जाते. नाका चुकवून रोज दिवसा व रात्री ट्रक भरून लाकूड वाहतूक सुरू आहे. अशा गाड्यांना अडविण्याचे धाडस वनविभागाकडे नाही.
अवैध वृक्षतोड करणाऱ्या विरोधात कडक कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच वृक्षतोडीला आळा बसणार आहे.
अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दिवसरात्र वनविभागाची गस्त सुरू आहे. कुठे वृक्षतोड होत असेल तर त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- – विष्णू ओमासे, वनपाल, वनविभाग
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात वृक्ष तोडणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. यासंदर्भात निवेदन दिले. मात्र, वृक्षतोड कमी होत नाही.सॉ मिल, कोळसा भट्टया, लाकडाच्या अड्ड्यावर लाकडाचे ढिगारे व ओंडके पडले आहेत.याची तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी.
- – विक्रम ढोणे, सामाजिक कार्यकर्ते